कोल्हापूर : शहरासह गेल्या दोन – तीन दिवसांपासून सुरू असणारा पाऊस गुरुवारी पण सुरुच होता. पूर्व भागात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर काहिसा ओसरला.
कोल्हापूर सलग पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकाचे प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे प्रत्येक गावातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील मार्ग बंद पडण्याचे प्रकार घडले. दरम्यान, खरिपाचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
खरीप काढणीच्या वेळीच पाऊस आल्याने विशेष करून भात, सोयाबीन मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काढणी होणाऱ्या भातात पाणी साचून राहिल्याने आता भात कापणी करणे जवळजवळ अशक्य बनले आहे. परिणामी यंदा खरीप पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने पिकाची वाढ जोमदार झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता होती. परंतु, ऐन काढणीच्या वेळी संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे यंदा शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी निराश झाले आहेत.
यंदा भाताचे पीक चांगले आले होते भात पाकणी भाताची कापणी करण्याअगोदरच जोरदार वाऱ्यामुळे सत्तर टक्के भाताचे नुकसान झाले आहे.