पुणे – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
राज्यात काही दिवस पावसाचा खंड पडला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेले चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी वातावरण बनत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून विदर्भासह राज्यातील काही भागात पावसाने जोर धरला आहे.
सध्या राज्यातील काही भागात सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच मध्यरात्रीनंतर हवेत काहीसा गारवा तयार होत आहे. तर सकाळी काहीसे धुके पडत असल्याची स्थिती आहे. सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत १.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुण्यात ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.
या जिल्ह्यांत मुसळधारेचा अंदाज
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.