उन्हाळी भुईमूगाचे व्यवस्थापन तंत्र आणि सिंचन व्यवस्थापन

5
(230)

सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमूग सध्या आऱ्या सुटणे ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या स्थितीमध्ये पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतात.

महाराष्ट्रामध्ये सुमारे ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग लागवड केली जाते. उन्हाळी भुईमुगाचे उत्पन्न खरीप हंगामापेक्षा दीड ते दोन पटीने जास्त येते. साधारणतः उन्हाळी भुईमुगाची सरासरी उत्पादकता १७०० किलो प्रती हेक्टर आहे. या काळात योग्य वेळी पाणी पुरवठा करणे गरजेचे असते. त्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो.

उन्हाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. या वातावरणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो. ऐन उन्हाळ्यात जनावरांना हिरवा किंवा वाळवून वापरण्यायोग्य २ ते ३ टन पौष्टिक चारा मिळतो. सोबतच बेवड आणि फेरपालट या दोन गोष्टी साध्य होतात.

शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (२५ टक्के) आहेत. महाराष्ट्रात वाढत असलेल्या फळबाग आणि कपाशी क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणूनही हे पीक घेता येते. सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमूग संदर्भात सद्यःस्थितीत खालील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

 1. सध्या उन्हाळी भुईमूग पीक हे साधारणतः आऱ्या सुटण्याच्या ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. पहिल्या दीड महिन्यात दोन खुरपण्या आणि दोन कोळपण्या करून पीक तणविरहित ठेवले असेल. सर्व प्रकारच्या आंतरमशागतीची कामे आऱ्या सुटण्याच्या आधीच करून घेणे गरजेचे असते. शेवटची कोळपणीसुद्धा खोल आणि पासेला दोरी बांधून केलेली असावी.
 2.  पीक ४० दिवसांचे आणि ५० दिवसांचे असताना २०० लिटर पाण्याचा पत्र्याचा मोकळा ड्रम दोनदा फिरवून घ्यावा. यामुळे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात आणि त्यांनाही शेंगा लागतात. आऱ्या सुटण्याच्या अवस्थेपासून पिकात आंतरमशागतीची कामे (डवरणी) करू नयेत.

सिंचन व्यवस्थापन ११ महत्वाचे मुद्दे

 1. जातीनुसार भुईमुगाचा कालावधी साधारणतः: ९० ते ११५ दिवसांचा असू शकतो. तुषार सिंचन पद्धतीचा वापर हा उन्हाळी भुईमुगाच्या ओलित व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
 2. फुलोरा येण्याच्या अवस्थेपासून (म्हणजेच पेरणीपासून २२ ते ३० दिवस) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून ४५ ते ५० दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५ ते ८० दिवस) या वेळेस पाण्याची पाळी चुकवू नये.
 3. पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसारच ठरवावे.
 4. एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळींमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
 5. ओलित व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
 6. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्‍यक असते. साधारणतः पीक फुलोऱ्यात असताना, आऱ्या सुटण्याच्या वेळी, शेंगा दुधात असताना आणि शेंगा भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे या अवस्थेत पिकास पाणी देणे महत्त्वाचे आहे.
 7. विशेषतः भुईमुगाला तुषार सिंचनाने पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. सर्व पिकास सम प्रमाणात पाणी देणे शक्य होते.-उन्हाळी भुईमूग पिकास एकंदरीत १५ ते १६ पाण्याच्या पाळ्यांची आवश्यकता असते.
 8. ओलित व्यवस्थापन करताना पाण्याच्या पाळ्या, फेब्रुवारी महिन्यात १० ते १२, मार्च महिन्यात ८ ते १०, एप्रिल महिन्यात ६ ते ८ आणि मे महिन्यात ४ ते ६ दिवसांनी पिकास ओलित करावे.
 9. पिकाच्या संवेदनशील अवस्था जसे, शेंगा धरणे, शेंगा पोसणे व
 10. दाणे भरणे दरम्यान पाण्याचा ताण पडल्यास नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
 11. आऱ्या जमिनीत जाण्यासाठी ओलावा योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे. एप्रिल व मे महिन्यात तापमानात वाढ होत असल्यामुळे पाणी व्यवस्थापनाची काळजी घ्यावी.

अन्नघटक पूर्तता 


शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाला कॅल्शिअम या अन्नद्रव्यांच्या पूर्ततेसाठी पीक ५० टक्के फुलोरा अवस्थेत ते आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत असताना शिफारशीप्रमाणे जमिनीत ३०० ते ५०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जिप्समचा वापर करावा. जिप्सममधून २४ टक्के कॅल्शिअम व १८ टक्के गंधक पिकास मिळते. सुरवातीला डीएपी खत दिले असेल तर जिप्समचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पोचट शेंगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

भुईमुगाची काढणी

 1. भुईमुगाची काढणी योग्य वेळी करावा. साधारणतः ७५ ते ८० टक्के शेंगा परिपक्व झाल्यानंतरच काढणीस आरंभ करावा.
 2. पीक काढणीस योग्य झाले की नाही हे पाहण्यासाठी शेतातील १-२ झाडे वेळोवेळी उपटून खात्री करून घ्यावी. शेंगा पक्व झाल्या म्हणजे शेंगावरील शिरा स्पष्ट दिसू लागतात. शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागते. बियाणे टणक होऊन मुळचा रंग प्राप्त होतो.
 3. भुईमुगाचा पाला पिवळा आणि शेंगाचे टरफल टणक झाल्यावर विशेषतः आतील बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी.
 4. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवून त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते ९ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणावे.
 5. अशा पद्धतीने उन्हाळी भुईमुगाचे व्यवस्थापन केल्यास हेक्टरी ३० ते ३५ (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच ४ ते ५ टन कोरडा पाला उत्पादन मिळते.

– डॉ. राजेंद्र भाकरे, ७६२०७९४८३५
भुईमूग पैदासकार, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रस, जि. सांगली.)

source & credit – agrowan

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 230

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment