सोयाबीन काढणीच्या तोंडावर पाऊस सुरु झाल्याने मालाचे नुकसान होत आहे. परंतु पावसाआधी काढणी झालेल्या दर्जेदार सोयाबीनला काल सोमवारी (ता.१२) वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामातील उच्चांकी ४३११ रुपये दर मिळाला. बाजारात सुमारे चार हजार पोत्यांची आवक झाली होती.
या हंगामातील नवीन सोयाबीनची काढणी सुरु असून बाजारपेठेत विक्रीसाठी आवक वाढू लागली आहे. वाशीम जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर मानला जातो. या जिल्ह्यातील दर्जेदार सोयाबीन बियाण्यासाठी अधिक प्रमाणात वापरले जाते.
मागील दोन हंगामापासून सोयाबीन काढणीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावत नुकसान केले. यंदाही सध्या अशीच स्थिती आहे.
सलग पावसामुळे अनेकांचे सोयाबीन सोंगणी होऊनही त्याची सुडी शेतातच पडून आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसाच्या तडाख्यातून सुटले, असा माल आता चांगला भाव खाऊ लागला आहे. सोमवारी वाशीममध्ये कमीत कमी ३८०० व जास्तीत जास्त ४३११ रुपयांचा सोयाबीनला भाव भेटला. ३९७५ पोत्यांची आवक झाली होती.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी ३६५० रुपये भाव मिळाला. कमीत कमी ३३०० व जास्तीत जास्त ३८२५ रुपये दराने सोयाबीन विकले. ६८७९ पोत्यांची आवक होती.
source – agrowon