दिंडोरी: नाशिक जिल्यातील अनेक गावांमधील शेतकरी हंगामनिहाय भाजीपाला लागवडी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, काही भाजीपाला रोपवाटिकेंमध्ये रोपे वारंवार निकृष्ट दर्जाची येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच बियाणे कंपन्या व भाजीपाला रोपवाटिकाचालक हात वर करून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
अशीच एक घटना नाशिक व दिंडोरी तालुक्या समोर आली आहेत. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील शेतकरी मच्छिंद्र शिंदे यांनी खासगी रोपवाटिकेतून ८ हजार रोपांची प्रतिरोप ६० पैशांनी खरेदी केली होती. ५ ऑगस्ट रोजी २० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. लागवडीनंतर खते व फवारण्या केल्या. मात्र, कंदाची वाढ झाली नाही; नुसते डेरेच वाढले. कंदाची अपेक्षित वाढ न झाल्याने विक्री करणेही अशक्य होते. त्यामुळे मशागत, लागवड, मजुरी, फवारण्या व खत यावर केलेला ५० हजार रुपयांचा खर्च वाया गेला. याबाबत संबंधित रोपवाटिका संचालकांकडे तक्रार केली. संबंधित बियाणे कंपनीकडे तक्रार केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून चौकशीचे आश्वासन दिले. मात्र, नंतर आता टाळाटाळ करून नुकसानीकडे दुर्लक्ष केले, असे शिंदे यांनी सांगितले.
नाशिक तालुक्यातील पळसे येथील शेतकरी विलास गायधनी यांनी गावाशेजारील भाजीपाला रोपवाटिकेतून लागवडीयोग्य ५ हजार रोपे खरेदी केली. ही रोपे अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केली. त्यांचे अशाचप्रकारे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे.
भाजीपाला रोपवाटिका व संबंधित बियाणे कंपन्यावर अंकुश नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्या नित्कृष्ट दर्जाचे बियाणे वारंवार बाजारात आणून विक्री करत आहेत. त्यावर कृषी खात्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व अश्या कंपन्या आणि रोप वाटिकांवर कडक कारवाई केली पाहिजे.