निवृत्तीनंतर अनेक लोक आपल्या मुलांवर निर्भर होतात परंतु काही लोक असेही असतात की जे निवृत्तीनंतर देखील एक नवीन वाट धरतात. असाच एक नवीन प्रयत्न उत्तरप्रदेशच्या कनक लता यांनी केला आहे. पतीच्या निवृत्तीनंतर त्यांनी गावी येऊन टोमॅटोची शेती केली. सुरवातीला अनेक संकटाना तोंड देत आज त्या यशस्वी शेतकरी बनल्या आहेत.
२०१७ मध्ये जेव्हा कनक लता यांचे पती निवृत्त झाले तेव्हा त्यांनी गावी असलेल्या दीड एकर जमिनीवर शेती करण्याचे ठरवले.
५७ वर्षीय कनक लता यांनी सुरवातीला शेतीतील थोड्याफार माहितीवर गहू, टोमॅटो व मटारची लागवड केली. सुरवातीला उत्पादन कमी निघत असल्याने लोक त्यांना नावे ठेवत. परंतु कसल्याही गोष्टीला बळी न पडता आज कनक लता एका दिवसात ७ क्विंटल टोमॅटोचे उत्पादन घेत असून त्यांच्या टोमॅटोला केवळ भारतातच नव्हे तर युनाइटेड किंगडम व ओमान या ठिकाणी देखील मागणी आहे.
कनक यांनी यश मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न केले असून जैविक शेती करण्यासाठी प्रशिक्षण देखील घेतले आहे.
जमिनीमध्ये जैविक खते व वर्मीकंपोस्ट टाकून २०२० मध्ये कनक लता यांनी दुर्ग व आर्यमन या दोन टोमॅटोंच्या जातींची लागवड केली. दुर्ग या जातीच्या टोमॅटोंना बाजारात जास्त भाव असल्याचे त्या सांगतात.
कनक सांगतात की, प्रत्येक दिवशी शेतीतून टोमॅटोचे चांगले उत्त्पन्न निघत असून यापासून भरपूर फायदा झाला असल्याचे कनक लता सांगतात. या यशानंतर कनक यांनी न थांबता शिमला मिरची, स्ट्राबेरी, ड्रॅगन फ्रुट व काळे टोमॅटो यावरती देखील प्रयोग करण्यास सुरवात केली आहे.
कनक सगळ्या शेतकऱ्यांना एक आवाहन करतात की त्यांनी अशी सिंचन प्रणाली निवडावी की ज्यामध्ये वीज व पाण्याची बचत होईल. उत्त्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक पद्धतींचा वापर करण्याचाही सल्ला त्या देतात.
source agriwala