महाराष्ट्र-राज्यातील काही भागात पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडेल. शुक्रवारी (२ सप्टें) खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्हयात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
शनिवारी (३ सप्टें) आणि रविवारी (४ सप्टें) कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
मराठवाडा आणि विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात कडक ऊन पडून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान आहे. यामुळे कोकणातील मालवण येथे मध्यम पाऊस पडला असला तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. अनेक भागात पावसाची उघडीप असल्याने शेतीकामे वेगाने सुरू झाली आहेत. मध्य महाराष्ट्रातही आटपाडी येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
दरम्यान, मराठवाड्यातही पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. यामुळे वेगाने सुरू झालेली शेतीकामे खोळंबली आहेत. माजलगाव, मुदखेड, सोनपेठ, गंगाखेड येथे पावसाच्या जोरदार सरी पडल्या. तर विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने तूर, कापूस पिकांना दिलासा मिळाला.
source – agrowonegram