शेतकऱ्यांनो सावधान! ‘निवार’ चक्रीवादळ तीव्र होण्याचा अंदाज

5
(1)

निवार चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडू आणि पुदुच्चेरीला बसण्याची शक्यता आहे. वादाळाचा परिणाम तामिळनाडूत मंगळवारी दिसून आला. चेन्नईत मंगळवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणीही साचले होते.

बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागात ‘निवार’ चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असल्याने त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होणार आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे आज (ता.२५) भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे तुरळक ठिकाणी मेघगर्नजेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

या वादळाचा सामना करण्यासाठी तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशात बचाव दलाची १२०० जवान तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच आणखी ८०० जवानांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १२ गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर वादळच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या आधीच काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अरबी समुद्रात आलेले ‘गती’ चक्रीवादळ निवळते तोच बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२४) नव्याने चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यातच ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. यातच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीत वाढ झाली असली, तरी दुपारी उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ हे पुद्दुचेरीपासून ४१० किलोमीटर, तर चेन्नईपासून ४५० किलोमीटर अग्नेयेकडे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत (ता.२४) या भागात चक्रीवादळ तयार होऊन त्याची तीव्रता वाढली आहे. ही वादळीप्रणाली पूर्व किनारपट्टीकडे झेपावत असून, बुधवारी (ता. २५) दुपारपर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या कराईकल आणि ममल्लापूरमलगत किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात पावासाचा फटका बसणार आहे.

तामिळनाडू-पुदुचेरीच्या बर्‍याच भागात पाऊस

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील चेंबरमबक्कमसह सर्व मोठ्या धरणांवर सतत नजर ठेवली जात आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. हे वादळ मंगळवारी पुदुचेरीपासून ४१० आणि तामिळनाडूपासून ४५० किमी अंतरावर होते. वादळापूर्वी तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या बर्‍याच भागात पाऊस सुरू झाला आहे. वादळामुळे बुधवारीही बर्‍याच ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तटरक्षक दलाचे ८ जहाज, २ विमाने तैनात

वादळाची तीव्रता पाहता बंगालच्या उपसागराच्या तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्याजवळ तटरक्षक दलाची ८ जहाजं आणि २ विमानं तैनात करण्यात आली आहेत. या जहाजांद्वारे मालवाहू जहाजं आणि मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना साधवानतेचा इशारा दिला जात आहे. एनडीआरएफचे पथक नागरिकांना खराब हवामानात बचावासाठी कसे उपाय करायचे याची माहिती देत आहेत.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment