नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – डॉ. भारती पवार यांची मागणी

Spread the love

नाशिक – जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार संघातील नुकसानीचा खासदार डॉ. भारती पवार यांनी आढावा घेतला.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे, घरांचे व रस्त्यांसह आदी भागांचे तीव्र नुकसान पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. यासह नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राव्दारे केली.

अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांची घरे तसेच रस्ते वाहून गेली आहेत. तर शेतातील उभी पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही भागांत ढगफुटी सदृश्य परिस्थिती उद्भवल्याने उभ्या पिकांसह शेतातील माती वाहून गेली आहे. त्याचबरोबर डॉ. पवार यांनी या परिस्थितीची चौकशी केली असता नुकसानींचे पंचनामे होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

देवळा तालुक्यात जून ते सप्टेंबर पर्यंत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या मका, बाजरी, सोयाबीन, मुंगसह पोळ कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर पिकांचे अतोनात नुकसान होत आले आहेच; पण जोरदार झालेल्या पावसाने शेतात पाण्याचा निचरा न झाल्याने उन्हाळी कांद्याच्या रोपांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने बुरशी रोगाचा प्रादुर्भाव व तीव्र ऊन यामुळे उन्हाळ कांदा पीक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अगोदरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांचे जीवनमान विस्कळीत झाले असताना निसर्गाने देखील अवकृपा केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याने त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *