पुणे : दोन दिवसापासून राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. ढगाळ वातावरणामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणात सकाळपासून उकाडा वाढला असून किमान व कमाल तापमानात चढउतार सुरू झाले आहेत. आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरुवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यात थंडी वाढू लागली असून विदर्भाच्या काही भागात किंचित थंडी आहे. सध्या पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने गारठा कमी झाला आहे.
बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. ईशान्य मोसमी वारे सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर शनिवारपर्यंत (ता.२१) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुरुवारी (ता. १९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून ती पश्चिमेकडे सरकून जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊन राज्याच्या किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने सकाळी गारठा तर दुपारी उकाडा असे हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.